नमस्कार मित्रांनो,
आगं आशा. माझी साडी काढलीस का गं कपाटातून ? आवर लवकर. असं म्हणून माई आतल्या खोलीत आल्या. आशा त्यांच्याच साडीला इस्त्री करत होती. आणि त्यावर कोणते दागिने आज त्यांना द्यायचे याचा विचार करत होती. हो माई, याना हे बघा, आत्ता तुमच्या साडीलाच इस्त्री करत होते. आणि आज हे दागिने घाला तुम्ही. आजच्या कार्यक्रमाला छान शोभून दिसतील तुमच्यावर.
असं ती म्हणताच आशाची जाऊ आणि नणंद आत आल्या. शी माई, हे काय? मोत्याचे कसले दागिने घालतेयस. सोनं काय केलंस ! देऊन टाकलंस की काय हिला ? कि, हिने काढून घेतल तुझ्याकडून ? असं नणंदेच हसतंच पण खोचक बोलणं ऐकून आशाचा खुललेला चेहरा एकदम पडला. माईं मी जरा हॉलवरची तयारी कशी झालीये ते बघायला पुढे जाते. असं म्हणून ती बाहेरच गेली.
उगीच शब्दाला शब्द आजतरी तिला नको होता. नेहमीच त्या दोघी तिला पाण्यात पहायच्या.. त्या ही दोघीजणी नोकरी करायच्या. सारखं आपलं माई-माई करत मागे मागे करायच्या. पण नोकरी करतेच्या नावाखाली कधीही एकदाही अप्पा आणि माईना रहायला घेऊन जाणं तर नाहीच. पण, आशाला ही कुठे काही कारणास्तव जायची वेळ आली की ‘आम्ही नाही बाबा सारखं फिरायला जात’ असं म्हणून तिला जाण्यापासून थांबवायच्या किंवा मग एक दोन दिवस कसेबसे तिला जाऊ द्यायच्या.
या सगळ्याला त्यांच्या मते कारणच तसं होतं. आशा मध्यमवर्गीय घरातून आलेली, एम. टी. एन एल. मध्ये नोकरी करणारी, चारचौघींसारखी मुलगी अजय ने प्रेमविवाह करून घरात आणली होती. त्यामुळे मोठी जाऊ आणि नणंद बाईंना अजिबातच ती मान्य नव्हती. त्यात सोमण म्हणजे त्याकाळचे कलेक्टर सोमण. त्यामुळे पुण्यात सदाशिव पेठेत मोठा चौसोपी वाडा. मोठं घरदार. सगळंच बडं प्रस्थ. पहिले सगळे एकत्रच रहायचे, पण नंतर मोठा भाऊ वेगळा झाला ‘जुन्या वाड्या’ चं कारण समोर करून.
अजय आणि अप्पा वाड्याची वेळोवेळी डागडुजी करून घेत असत. तसं पाहिलं तर माईना पण आशा खूप काही आवडली नव्हती. पण अजयच्या हट्टापुढे आणि अप्पाच्यापुढे त्यावेळी तरी त्यांचं काही चाललं नव्हतं. या गोष्टीला आता ३२-३३ वर्ष झाली होती. आशाची कुचंबणा या दोघी आल्या की काही कमी होत नव्हती. तरीही ती मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करायची. कारण माई त्यांना कधीच काहीच बोलायच्या नाहीत. अप्पा मात्र नेहमी अप्रत्यक्षपणे आणि अजय प्रत्यक्षपणे आशाच्या मागे उभे असत.
माईच त्या दोघींना काही बोलत नाहीत तर मग मी काय म्हणून बोलायचं असं म्हणून आशा एका कानाने ऐकायची एका कानाने सोडून द्यायची. तर आज आक्कांचा म्हणजेच सौ. विजया विनायक सोमण यांचा पंच्याहत्तरीचा सोहळा होता. अजय आणि आशा, त्यांच्या धाकटा मुलगा आणि सुनेने, मोठा हॉल बुक केला होता. सोमण कुटुंब मोठं त्यामुळे घरचीच पण शंभर – दिडशे माणसं जमणार होती. विनायक सोमण यांची ३ मुलं, ५-६ नातवंड, त्यांच्या सासरघरचे, आत्ताच एक वर्षाचं असलेलं पतवंड असा घरचाच गोतावळा खूप होता.
अप्पा पण आता ८0 वर्षांचे होते. पण दोघेही शरीराने एकदम फिट होते. आज आक्का आणि अण्णा मस्त तयार झाले. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. हॉलवर पण सगळे माईंच कौतुक करता करता थकत नव्हते. आशा सगळ्यांचं हवं नको ते बघत होती. अजय पण त्याच्या परीने आनंदाने सगळ्यांची विचारपूस करत होता. माईना ७५ दिव्यानीं ओवाळलं गेलं. उखाणा झाला. पूर्वापार पद्धतीने औक्षण झालं. नंतर नातवंडांच्या आग्रहाखातर केक कापून सेलिब्रेशन झालं जेवणं झाली.
आणि पाहुणे मंडळी आपापल्या घरी परत गेल्यावर सगळे सोमण वाड्यात परत यायला निघाले. माईंची लेक नेहमीप्रमाणे पुढची आवरसावर करायला नको म्हणून तिथूनच घरी जायला निघाली. पण यावेळी माईनी तिला थांबवलं. आणि सगळ्या घरच्यांना वाड्यात घेऊन गेल्या. एक-दोन तास सगळ्यांचंच हुश्श करून झाल्यावर आक्कांनी प्रज्ञाला सांगून सगळ्यांना दिवाणखान्यात बोलावून घेतलं. सगळ्यांना कळतच नव्हतं अचानक कशाला बोलावलं असेल आक्कांनी ? जाऊबाई आणि नणंद बाई तोऱ्यात येऊन आई शेजारी येऊन बसल्या.
माईंचा आत्ताचा चेहरा आणि नूर काही वेगळाच आहे हे आशाला कळलं होतं! पण नक्की काय आहे हे नव्हतं कळत. सगळे दिवाणखान्यात जमले. अप्पा पण आतून काहीतरी घेऊन आले. आक्कांनी बोलायला सुरुवात केली. आता मी हे जे काही सांगत आहे ते मी आमच्या दोघांच्या वतीने सांगत आहे. खरंतर हे आम्ही गेल्यानंतर वाचलं गेलं पाहिजे पण ह्याची अंमलबजावणी आत्ता होणं गरजेचं असल्याने आम्ही आत्ता वाचत आहोत. हे आमच्या दोघांचं इच्छापत्र म्हणा किंवा मृ त्युपत्र म्हणा! त्यावर सगळे थोडे चरकले.
आज अप्पांनी मध्येच ते ही आजच्या दिवशी कुठे हा विषय काढला अशी कुजबुज होऊ लागली सगळ्यांमध्ये. त्यावर अप्पाच म्हणाले , मला माहितेय तुम्हा सगळ्यांना वाटत असेल आत्ता कुठे हे? पण हीच ती वेळ आहे. आम्ही हे रीतसर रजिस्टर करून घेतलेलं आहे. आणि हे आम्ही कुणाच्याही दबावाखाली येऊन केलेलं नाही. यात नमूद केल्याप्रमाणे सर्वप्रथम आम्ही हे राहातं घर आशा म्हणजे आमच्या धाकट्या सुनेला द्यायचा निर्णय घेतला आहे. याचं पुढे म्हणजे आमच्या नंतर काय करायचं हा निर्णय सर्वस्वी केवळ तिचाच राहील.
हे ऐकल्यावर नणंद आणि जाऊ यांचे चेहरे एकदम पांढरे फटक पडले. आक्का पुढे बोलत होत्या, जवळजवळ ३२-३३ वर्ष तिने ह्या घरासाठी, आमच्या दोघांसाठी खूप काही केलं आहे अगदी कुठलीही तक्रार न करता आणि अगदी आनंदाने. आजपर्यंत मी कधीच तिच्या बाजूने बोलले नाही त्यासाठी थोडं माझं ही चुकलंच. पण माझा ही सासुरवास खूप झाला या घरात म्हणून माझी दृष्टी तशीच झाली होती. प्रज्ञा आज मी सगळ्यांसमोर हे सांगते की, तुझ्यामुळे आमचे हे म्हातारपणीचे दिवस आम्ही खूप आनंदात घालवू शकलो.
आम्हाला इतर दोघांनी कुणीही कधीही पाहिलं नसतं. अजय बाहेरच असायचा ऑफिसमध्ये किंवा फिरतीवर. पण तू कधीही आम्हाला एकटं सोडलं नाहीस. साधं अमेरिकेत मुलांकडे पण तुम्ही जाऊ शकत नाही आमच्यामुळे यांच्या श्वासाच्या त्रा’सामुळे हे घाबरतात म्हणून तुम्हीही गेला नाहीत. आणि त्याबद्दल कधीही एका अक्षराने तक्रार केली नाहीस. आणि यासाठीच आम्ही आमच्या ईच्छा पत्रात पुढचा क्लॉज घातला आहे. तर बाकीच्या दोघांनी हे कान देऊन ऐका. माझे दागिने जवळ-जवळ २० तोळ्यांचे आहेत आणि शिवाय यांचे त्या काळी घेतलेले आत्ताच्या किमतीनुसार जवळपास ५०-६० लाखांचे शेअर्स आहेत.
हे आम्ही आमचा मोठा मुलगा मनोज आणि मधली मुलगी वनिता हिला आम्ही गेल्यानंतर अर्धे अर्धे वाटून देणार आहोत. फक्त यात एक अट आहे. यापुढील महिन्यापासून त्या दोघांनी आम्हा उभयतांना त्यांच्या घरी प्रत्येकी ६-६ महिने घेऊन जावे. आम्हाला वाटलं तर आम्ही अजयकडे येऊ पण त्यांनी आम्हाला जाण्यासाठी प्रवृत्त करायचं नाही. हे मान्य असेल तरच हे होईल नाहीतर सगळंच आमचा तिसरा मुलगा अजयला देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. हे ऐकल्यावर आशाला ध’क्का बसला.
तसा ध’क्का सगळ्यांनाच बसला पण आशाला काही कळेचना आणि तिच्या एकदम डोळ्यातून पाणीच आलं. तिने माईना मि’ठी मा रली. माई मला एकदम असं परकं नका न करू. मी कुठे कमी पडले का तुमचं काही करण्यात? अहो आता आम्ही दोघेच या एवढ्या वाड्यात राहून काय करणार. आम्हाला तुम्ही दोघेही हवे आहात. अप्पा, सांगा न आक्कांना. तेव्हा अप्पा प्रज्ञाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाले, पोरी खूप केलंस ग आमचं. अगदी तुझी नोकरी सांभाळून केलंस.
आता बाकीच्यांना पण करू देत की. अप्पाना मध्येच थांबवत माई म्हणाल्या, आशा. अग हे आम्ही आनंदाने करत आहोत. म्हणूनच तर इच्छापत्र म्हणत आहोत. आमची ही इच्छा आहे पण जर नाहीच अंमलात आणली गेली तर आहोतच की आम्ही इथे. अग, आमच्यात खूप गुरफटली गेली आहेस तूला वेळ आहे या साऱ्यातून मुक्त होण्याची आशा म्हणून दोघांनी देखील आशाच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला.