Marathi Mania

महाराष्ट्राचे नंबर 1 सोशल न्यूज पोर्टल

भरणी श्राद्ध म्हणजे काय..? ते का करावे.. ते करण्याचे काय महत्व असते बघा जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो,

श्राद्ध हा हिंदू आणि इतर भारतीय धर्मांमध्ये पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी केला जाणारा विधी आहे. ज्या पूर्वजांमुळे आज आपण अस्तित्वात आहोत, ज्यांच्याकडून आपल्याला गुण, कौशल्ये इत्यादींचा वारसा लाभला आहे, त्यांचे आपल्यावर न फेडलेले ऋण आहे, अशी यामागे एक धारणा आहे.

तसेच भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते. मृताच्या पहिल्यावर्षाच्या आत येणाऱ्या भाद्रपदातील भरणी मुळ नक्षत्रावर धरून श्राद्ध करावे. पितृपक्षात जर मृताचे भरणी श्राद्ध केले नाही तर त्याची प्रेतत्वातून मुक्ती कशी बरे होईल, असा सवालही शास्त्रकारांनी उपस्थित केला आहे.

त्याचप्रमाणे भरणी नक्षत्रावर सपिंड श्राद्ध न केले तर तो मृतात्मा प्रेतत्वापासून कसा मुक्त होईल, असे शास्त्रकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्यांना जिवंतपणी तीर्थयात्रा घडलेल्या नसतात, अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया, पितृगया, पुष्करतीर्थ, ब्रह्मकपाल इ. तीर्थावरील श्राद्धांचे फळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते.

तसेच ज्यांना आपल्या पितरांना उद्देशून गयादि तीर्थांवर श्राद्धे करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक क्षमता व वेळ यांच्या अभावी ते करता येणे शक्य नसल्यासही भरणी श्राद्ध करतात. त्यामुळे दरवर्षी भरणी श्राद्ध करावे, असे शास्त्रकार सांगतात. वास्तविक पाहता पुरातन काळी पितृपक्षामध्ये सर्वच दिवस श्राद्ध करण्याचा प्रघात असल्यामुळे त्यात भरणी श्राद्ध होतच असे.

परंतु कालौघात पितृपक्षात मृताच्या फक्त तिथीच्या दिवशीच श्राद्ध करण्याची प्रथा पडल्यामुळे भरणी श्राद्धाबाबत वेगळा विचार करणे भाग पडत आहे. भरणी श्राद्धात पिंडाचा निषेध सांगितलेला आहे. तो प्रथम वर्षानंतर दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी भरणी श्राद्धासंबंधी समजावा, असे शास्त्रकार सांगतात. भरणी श्राद्ध मृताच्या पहिल्या वर्षी करावे की दुसऱ्या या वर्षीपासून करावे,

याबाबत देशभरातील विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. अनेक ठिकाणी तर दरवर्षी भरणी श्राद्ध अवश्य करावे, परंतु पहिल्या वर्षी बिलकूलच करू नये, असे सांगितले जाते. तर काही ठिकाणी पहिल्या वर्षी अवश्य करावे व नंतर इच्छा असल्यास दरवर्षी करावे, असे म्हटले जाते. त्यामुळे सांप्रत हे भरणी श्राद्ध कधी करावे आणि कधी करू नये, याबाबत भाविकांनी देशकालानुसार निर्णय घ्यावा, असे सांगून ठेवलेले आहे.

काहींच्या मते तर भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघा नक्षत्रादि श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसऱ्या वर्षीपासून करावीत, असे म्हणतात. नित्य तर्पणातदेखील मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये, असे म्हटले जाते.

तसेच या श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा? असा प्रश्न अनेक लोकांना पडत असतो. तर श्राद्ध तसेच पक्षाचा स्वयंपाक कोणी करावा, याबाबत शास्त्राने स्पष्टपणे सांगितलेले आहे. श्राद्धमंजिरी या पुस्तकात याचे सविस्तर विवेचन आलेले आहे. शक्य असेल तर श्राद्धकर्त्याने स्वत: हा स्वयंपाक करावा.

ते शक्य नसेल तर त्याच्या पत्नीने करावा. तेही शक्य नसेल तर भावकीने, सजातीय, सदाचारी, स्रेही, मित्र, मातृ-पितृ वंशज यांनी करावा. तेही शक्य नसेल तर सौभाग्यवती, पुत्रवती महिला आदींकडून हा स्वयंपाक करावा, असे शास्त्राने सांगितलेले आहे. श्राद्धातील बारीक-सारीक बाबींचेही शास्त्राने विवेचन केलेले आहे.

देवस्थानी व पितृस्थानी भोजनाला बसणाऱ्या ब्राह्मणांचे आसन कसे असावे, याबाबतही स्पष्टपणे सांगितलेले आहे. हे आसन रेशम, लोकर, लाकूड, कुशाचे असावे, असे म्हटले आहे. मात्र, हे आसन लोखंडाचे कदापिही नसावे, असे सांगितलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *